घोटी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोेडविण्यासाठी निर्णय घेण्याबाबत ही भेट घेण्यात आली.शिक्षकांच्या बदली धोरणात सर्व समावेशक बदल करण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, घरभाडे भत्त्यासाठी मुख्यालयी संबंधाने दि. ९ सप्टेंबर २०१९ चे परिपत्रक रद्द करावे, प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधन २५ हजार करावे, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्र म संघटनांना विश्वासात घेऊन ठरवावा, ग्रामीण भागातील शाळकरी किशोरवयीन मुलींसाठी शाळास्तरावर सॅनिटरी नॅपकिन मोफत पुरवावेत, भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी निवेदनास अनुसरून बैठक घेण्याचे आश्वस्त केले. १ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन ग्रामविकास मंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक नेते काळू बोरसे-पाटील, विश्वनाथ मिरजकर, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य कोषाध्यक्ष केदु देशमाने, राज्य संघटक सयाजी पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, इगतपुरी तालुका नेते जनार्दन कडवे, तालुकाध्यक्ष सचिन कापडणीस आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडळाची मंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:33 PM