लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या रविवारी जिल्ह्णातील सात ते आठ तालुक्यांना झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका अकरा हजार शेतकऱ्यांना बसला असून, सुमारे ७१ गावांतील साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे. रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार कोसळलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली. खळ्यात काढून ठेवलेला कांदा भिजला तर द्राक्ष व डाळिंबाच्या बागा कोसळून पडल्या, त्याचबरोबर भाजीपाला पिकाच्या शेतात गारपिटीने तळे साचल्यामुळे उभी पिके नष्ट झाली.राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या निकषात बदल केले असून, पूर्वी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास शासनाच्या मदतीला शेतकरी पात्र ठरत असे, आता मात्र ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास शासनाकडून मदत दिली जाते. या अवकाळी पावसाने ३१७३ शेतकऱ्यांच्या १२३९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान केल्याचेही या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक कांदा, टमाटा व मका या तीन पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यामुळे त्याचा अहवाल राज्य शासनास पाठविण्यात आला असून, गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यातच ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले, मात्र त्याची भरपाईची कोणतीही घोषणा केलेली नाही.
अकरा हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका
By admin | Published: May 07, 2017 1:47 AM