नाशिक : शहरातील ५१ महाविद्यालयांत २० हजार ८४० जागांपैकी अकरावीचे आतापर्यंत ६ हजार ७०९ प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रमुख महाविद्यालयांच्या पहिल्या गुणवत्ता यादीत नावे नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे. उद्या (दि. २६) प्रमुख महाविद्यालयांत ही यादी जाहीर होणार आहे. शहरात अकरावीच्या एकूण २० हजार ८४० जागा असून, त्यांत विज्ञान शाखेच्या ७,९२०, वाणिज्य शाखेच्या ७,६८०, तर कला शाखेच्या चार हजार ७६० जागांचा समावेश आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर गेल्या सोमवारी प्रमुख महाविद्यालयांत पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. मंगळवारपासून महाविद्यालयांत प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यांत विज्ञान २,५१५, वाणिज्य २,२२८, तर कला शाखेच्या १,७१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रियेसाठी आजही महाविद्यालयांची आवारे गजबजून गेली होती. उद्या (दि.२६) प्रमुख महाविद्यालयांमध्ये दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष या यादीकडे लागले आहे. या यादीत नावे समाविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया दि. २६ व २७ रोजी पूर्ण केली जाईल. त्यानंतरही जागा शिल्लक राहिल्यास त्या-त्या महाविद्यालयात सोमवारी (दि. २९) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, केटीएचएम महाविद्यालयाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी सायंकाळीच जाहीर करण्यात आली. या यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या दिवसभरात आॅनलाइन प्रवेश अर्ज भरायचा आहे व शनिवारपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करावयाचा आहे. (प्रतिनिधी)
अकरावीचे ६ हजार ७०९ प्रवेश निश्चित
By admin | Published: June 26, 2015 2:08 AM