नाशिक : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही तब्बल १२ हजार ९७० जागा रिक्त असून या जागांवर दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील ५५६ उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अकरावी प्रवेशाची संधी मिळणार आहे. दरम्यान, रिक्त जागांवर विशेष फेरी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविताना एसईबीसी प्रवर्गातील विद्यर्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी अर्जात दुरुस्ती करण्याची व नव्याने अर्ज करण्याची शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आतापर्यंत एकूण ३१ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
राज्य सरकारने बुधवारी (दि. २३) एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यामुळे गुरुवारी (दि. २४) डिसेंबर रोजी जाहीर होणारे यादी पुढे ढकलण्यात आली असून विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण विभागाने दिली आहे. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा सर्वसाधारण प्रवर्ग निवडण्यासाठी अकरावीच्या ऑनालाइन प्रवेश प्रक्रिया पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र विशेष फेरीचे महाविद्यालय वाटप स्थगित करण्यात आले असून यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना भाग एक भरून लॉक करणे, पडताळणी करून घेणे तसेच पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करून विशेष फेरीसाठी तत्काळ अर्ज करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत रिक्त असलेल्या जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना २७ डिसेंबरला प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे, निवडलेल्या पर्यायांमध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे.
इन्फो -
आज पसंतीक्रम नोंदविता येणार
अकरावी प्रवेशासाठी नव्याने नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आतापर्यंत ३१ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, यातील २६ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले असून २६ हजार ४२६ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर १८ हजार १५८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रमी नोंदविला आहे. यातील १२ हजार ३४२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून अजूनही नाशिक महापालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या १२ हजार ९७० जागा रिक्त आहेत. या जागांसाठी २७ डिसेंबरला प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे, निवडलेल्या पर्यायांमध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे.