नाशिक : जिल्ह्यातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया येत्या सोमवारपासून (१५ जून) सुरू होणार असून, महाविद्यालयांमध्ये पहिली गुणवत्ता यादी २२ जून रोजी जाहीर होणार आहे. याच दिवशी अनेकांच्या प्रवेशाचा फैसला होणार आहे. शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी चांदवड येथे जिल्ह्यातील प्राचार्यांच्या बैठकीत सदर कार्यक्रम जाहीर केला.दहावीचा आॅनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला असला, तरी विद्यार्थ्यांच्या हातात अधिकृत गुणपत्रिका पडलेल्या नाहीत. येत्या १५ जून रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांतून गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. या दिवसापासूनच अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. १५ ते १८ जून या कालावधीत महाविद्यालयांमध्ये अर्जांचे वितरण व स्वीकृती केली जाणार आहे. १८ ते २२ जून या कालावधीत अर्जांची छाननी केली जाणार असून, दि. २२ रोजीच सायंकाळी ४ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. २५ जूनपर्यंत गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. प्रतीक्षा यादीतील प्रवेश देऊनही महाविद्यालयात जागा शिल्लक असल्यास गुणानुक्रमानुसार ३० जूनपर्यंत प्रवेश दिले जातील. तरीही जागा शिल्लक राहत असल्यास महाविद्यालयाने पुन्हा गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार ७ जुलैपर्यंत प्रवेश द्यावेत, अशा सूचना सूर्यवंशी यांनी प्राचार्यांना दिल्या. दरम्यान, सदर बैठकीत सूर्यवंशी, सहायक उपसंचालक दिलीप गोविंद, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी प्राचार्यांना प्रवेशासंदर्भात सूचना केल्या. प्रवेशअर्ज व माहितीपत्रकाची किंमत दहा रुपयांहून अधिक असू नये, डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून जादा फी घेऊ नये, विद्यापीठाच्या नियमाप्रमाणेच फी घ्यावी, अन्यथा संबंधित प्राचार्यांवर कारवाई केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीस जिल्हाभरातून सुमारे ३७५ प्राचार्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया येत्या सोमवारपासून
By admin | Published: June 12, 2015 1:46 AM