नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर १२ हजार ४७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, शुक्रवार (दि. १७) पासून विशेष फेरीसाठी अर्ज व ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी व जागा वाटप बुधवारी (दि. २२) जाहीर केले जाणार आहे.
शहरातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमधील २५,३८० जागांपैकी आतापर्यंत १२ हजार ४७८ जागांवर प्रवेश निश्चित झाल्यानंतर १२ हजार ९०२ म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत.
नाशिक शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी जिल्हाभरातील विविध भागातील विद्यार्थी नाशिकमध्ये येत असतात. परंतु, यावर्षी कोरोना संकटामुळे या विद्यार्थ्यांमध्ये घट झाली असून, शहरातील ६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ हजार ३८० जागा उपलब्ध असताना आतापर्यंत केवळ २४ हजार ४७१ विद्यार्थ्यांनीच अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.