नाशिक : शहरातील अमृतधाम येथील एका किराणा व्यावसायिकाचा कारोनामुळे मंगळवारी (दि.२) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील बळींचा आकडा ११वर गेला आहे. दरम्यान, शहरात अनेक भागांत रुग्ण वाढत असले तरी मार्केट यार्डाशी संबंधित बाधितांची संख्या वाढतच आहे. आत्तापर्यंत सुमारे १८ रुग्ण मार्केट यार्ड कनेक्शनमुळे झाले असून, त्यामुळे महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाशिक शहरात कोरोनामुळे वडाळा ‘हॉटस्पॉट’ ठरला असून संपूर्ण परिसरच महापालिकेला सील करावा लागला आहे, तर दुसरीकडे पंचवटीदेखील ‘हॉटस्पॉट’ ठरू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी पंचवटीतील अमृतधाम येथील बीडी कामगार वसाहतीत सोमवारी (दि.१) एका बाधिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र याच ५७ वर्षीय इसमाचा मंगळवारी (दि.२) जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्याचा किराणा व्यवसाय असला तरी त्याचबरोबर भाजीविक्रीदेखील करीत असल्याची माहिती महापलिकेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचे मार्केट यार्डात जाणे-होणे होते काय याचा संबंध महापालिका तपासत आहे. पंचवटीतील किशोर सूर्यवंशीमार्ग परिसरात समर्थनगर येथेदेखील ६६ वर्षीय वृद्धाचादेखील पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. तो त्याच्या कुटुंबातील व्यक्ती मार्केट यार्डात कामाला असल्याने संसर्ग झाला असावा, असा महापालिकेचा कयास आहे. या बाधितावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सोमवारी (दि.१) डिसूझा कॉलनीतील एका व्यक्तीला संसर्ग झाल्याची घटना घडल्यानंतर याच भागातील कॉलेजरोडवरील कृषीनगर येथे पंडित पार्क येथील एकाला संसर्ग झाल्याचा अहवाल रात्री मिळाला होता, तर मंगळवारी (दि.२) गंगापूरोडवरील शर्मिला अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेलादेखील संसर्ग झाल्याचा अहवाल मिळाला आहे. ही महिला मुंबई प्रवास करून आल्याचे समजते, तर सिडकोतील शिवशक्ती चौकातील एका ३७ वर्षीय रहिवासी व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पंचवटीप्रमाणेच जुन्या नाशिकसारख्या दाट वसाहतीत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेच्या दृष्टीने ती चिंता वाढवणारी बाब आहे. सोमवारी (दि.१) एकूण १२ बाधित नाशिकमध्ये आढळले. त्या काझीपुरा येथील १६ वर्षाचा युवक, तसेच ३२ वर्षीय इसम, बागवान पुरा येथील १२ वर्षांची मुलगी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिंगाडा तलाव येथील २९ वर्षीय महिला व पंधरा वर्षांच्या मुलाला संसर्ग झाला आहे. वडाळागावात रात्री आणखी चार रुग्ण आढळले आहेत, तर पंचशीलनगर येथील एका महिलेचादेखील पॉझिटिव्ह अहवाल आल आहे. अशाप्रकारच्या दाट वस्त्यांमध्ये रुग्ण आढळल्याने नागरिकांतदेखील भीतीचे वातावरण आहे.--------------------बालिका बाधितपाटील पार्क परिसरातील अवघ्या तीन वर्षींय बालिकेलादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लहान मुले आणि वृद्धांमध्ये संसर्ग वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.---------------------मंगळवारी (दि.२) सायंकाळपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार शहरातील बाधितांची संख्या २४९ आहे. त्यातील ८५ जण कोरोनामुक्त असून, १४१ बाधितांवर उपचार सुरू आहेत, तर आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.