नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना शेतीमालाला हमीभाव व सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी आंदोलन करून राज्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षापासून दूर राहत किसान क्रांती मोर्चाने २ ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत गावोगावी चावडी-पारावर ‘मी शेतकरी’ या बॅनरखाली आंदोलन करण्याची भूमिका किसान क्रांती मोर्चाने घेतल्याची माहिती शेतकरी नेते तथा शेतकरी सुकाणू समीतीचे सदस्य डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी २०१७ मध्ये १ जूनपासून ‘शेतकरी संपावर’ आंदोलन क रून मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहराचा भाजीपाला व दूध पुरवठा खंडीत केला होता. पुणतांबा येथून सुरु झालेल्या या आंदोलनाला नाशिकसह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत शेतमालाचा संपूर्ण पुरवठा बंद केला होता. मात्र या आंदोलनादरम्यान काही शेतकरी नेते सरकारच्या दावनीला बांधले गेल्याचा आरोप झाल्याने संपात फुट पडल्याने आंदोलनाला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याची तयारी सुरु केली असून २ ऑक्टोबरपासून गावोगावी चावडी, पारावर ‘मी शेतकरी ’ या बॅनरखाली धरणे आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे नियोजन केले आहे.विविध राजकीय पक्षांच्या सभा अणि प्रचार रॅलींमध्ये सहभागी होताना ‘मी शेतकरी’ असे घोषवाक्य लिहिलेली टोपी घालून उपस्थित राहण्याचे अवाहनही या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने विविध राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर विसरुन जातात व पुढील निवडणुकीत त्याच त्याच आश्वासनांची बरसात करतात. अशा राजकीय नेत्यांना त्यांनीच गेल्या निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याचा यामागे उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. गावात येणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सरसकट कर्जमुक्ती आणि हमीभावाविषयी लेखी आश्वासन घेण्यासोबतच गावोगावी यासंबधीचे ठराव करून राज्यपालांना पाठविण्याचे नियोजन या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा हमीभावासाठी पुन्हा एल्गार; गांधी जयंतीपासून कर्जमुक्तीचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 5:21 PM
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना शेतीमालाला हमीभाव व सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी आंदोलन करून राज्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षापासून दूर राहत किसान क्रांती मोर्चाने २ ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत गावोगावी चावडी-पारावर ‘मी शेतकरी’ या बॅनरखाली आंदोलन करण्याची भूमिका किसान क्रांती मोर्चाने घेतल्याची माहिती शेतकरी नेते तथा शेतकरी सुकाणू समीतीचे सदस्य डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
ठळक मुद्देहमीभाव, कर्जमुक्तीसाठी शेतकरी उभारणार लढा गांधी जयंतीपासून मी शेतकरी बँनरखाली गावोगावी आंदोलन