नाशिक : इस्लाम व दहशतवाद याचा काडीमात्र संबंध नाही. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर हे मानवतेचे पुरस्कर्ते असून, त्यांनी नेहमीच समाजाला मानवता व सदाचाराची शिकवण दिली आहे; मात्र पाश्चिमात्य देशांमधील ‘वहाबी’ पंथांच्या काही दहशतवादी संघटनांकडून संपूर्ण जगभरात इस्लाम व मानवतेला काळिमा फासणारे दहशतवादी कृत्य केले जात असून, त्यांच्या कारवाया अत्यंत क्रूर व निंदनीय आहेत. ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनांच्या खोट्या निरर्थक प्रचार-प्रसारावर विश्वास ठेवू नये, असे पत्रक शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर करत दहशतवादाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. या पत्रकाचे वाचन शुक्रवारी (दि.२७) विशेष नमाजपठणादरम्यान शहर परिसरातील सर्वच मशिदींमधून धर्मगुरुंमार्फत करण्यात आले. पॅरिसवर झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत निंदनीय असून, संपूर्ण मानवेतला काळिमा फासणारा आहे. शहरातील ‘सुन्नी मरकजी सीरत समिती’ने याबाबत निषेध पत्रक जाहीर करून तीव्र शब्दांमध्ये दहशतवादी कारवायांवर हल्ला चढविला. जुने नाशिकमधील शाही मशिदीत खतीब यांनी सर्व सुन्नी धर्मगुरू व उलेमांसह सामाजिक, धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत ‘इसिस’च्या दहशतवादाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला व इसिससारख्या सर्वच संघटनांवर सुरू करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईचे समर्थन करण्यात आले.दरम्यान, शुक्रवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना इसिससारख्या दहशतवादी संघटना संपविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करणारे निवेदन खतीब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले. यावेळी समितीचे सचिव हाजी मीर मुख्तार अशरफी, युसुफिया फाउण्डेशनचे अध्यक्ष हाजी मुजाहीद शेख, बाबा खतीब, बिलाल खतीब, सलीम पटेल, हाजी जाकीर अन्सारी, नगरसेवक सुफी जीन आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
दहशतवादाविरोधात मशिदींमधून एल्गार
By admin | Published: November 28, 2015 10:39 PM