रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता माजी महापौर विनायक पांडे यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठक होऊन नंतर परिसरात रखडलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. नाशिक विशेषत: जुने नाशिक टेकण्यांवर निर्माण झालेला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना जुन्या नाशिकची फारशी माहिती नसते. त्यातूनच असले प्रकार घडत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून व्यापारी, व्यावसायिक रस्ता खोदकामांनी त्रस्त असून, मनपा आयुक्तांनी तातडीने विशेष बैठक घेऊन पोलीस आयुक्त, व्यापारी व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी माजी आमदार वसंत गिते यांनी केली. कोरोना काळात सर्वत्र व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेला व्यापारी नोटबंदीपासून त्रस्त होता. आता तरी रुग्ण संख्या कमी झाल्याने सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांना धंदा करण्याची संधी आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या संथगतीच्या कामाचा फटका त्यांना बसला असून त्वरित ही कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी अजय बोरस्ते यांनी शहराची परिस्थिती पाहिल्यावर नाशिकला महापौर आहे का, असा प्रश्न पडत असल्याचे सांगितले. मेनरोड, दहीपूल परिसर नाशिकची ओळख होती ती संपुष्टात आल्यासारखी झाली आहे. मेनरोड न राहता आता बोळ झाली आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय प्रमुख म्हणून आम्ही मनपा आयुक्तांना भेटणार असून, आयुक्तांनी तातडीने नियोजन करून पुर्वीप्रमाणे परिसर करून द्यावे, अशी मागणी केली जाणार आहे. अन्यथा जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशाराही बोरस्ते यांनी दिला. यावेळी ॲड. यतीन वाघ, माजी स्थायी सभापती संजय चव्हाण, माजी नगरसेवक नैय्या खैरे, सचिन बांडे, संदेश फुले, युवा सेनेचे ऋतुराज पांडे आदी शिवसेना नेते उपस्थित होते.
चौकट====
पक्ष जागे, कंपनी झोपलेलीच
दहीपूल, कानडे मारुती लेन, मेनरोड आदी परिसरात मागील कित्येक महिन्यांपासून स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. कधी उंचीवरून तर कधी संथ गतीच्या कामावरून कंपनीवर अनेक आरोप झाले आहेत. भाजपचे आमदार फरांदे, काँग्रेसचे गट नेते शाहू खैरे व आता शिवसेना शिष्टमंडळ यांच्यासह विविध राजकीय लोकांनी सतत याठिकाणी सुरू असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर तरी कंपनीला जाग येणार का व कामे पूर्ण होणार का, असा प्रश्न कायम आहे.
(फोटो २६ स्मार्ट)