लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमुक्तीच्या निमित्ताने नाशकात दाखल झालेल्या किसान मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी यात्रेत ‘समृद्धी’ महामार्गाचा विषय समाविष्ट करून त्यासाठी शेतकरी नेत्यांचे समर्थन मिळविण्यात आंदोलक शेतकरी यशस्वी झाल्याने समृद्धी विरोधकांच्या लढ्याला बळ मिळाले आहे. सोमवारी सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी एल्गार सभेत लक्षणीय हजेरी लावली. हातात समृद्धीच्या विरोधातील फलक व डोक्यावर ‘समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ अशा मजकुराच्या पांढऱ्या टोप्या घालून हे शेतकरी आले होते. खासदार राजू शेट्टी यांनी समृद्धीचा मुद्दा भाषणात मांडून सरकार भूमिसंपादन कायद्याची मोडतोड करीत असल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या नवनवीन स्वप्नवत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात असून, शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नसल्याचा इशाराही दिला. त्यामुळे समृद्धी बाधित शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनींचे दर जाहीर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत उमटले असून, शेतकऱ्यांनी दर पत्रकाची होळी करण्याबरोबरच शेतात सरण रचून ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित केल्या जाणाऱ्या राज्यातील दहाही जिल्ह्णांतील बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणण्याची घोषणाही जाहीर सभेत करण्यात आल्याने सिन्नर आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एल्गार सभेने ‘समृद्धी’ विरोधकांना बळ
By admin | Published: July 10, 2017 11:13 PM