संजय पाठक/ धनंजय रिसोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: भारत देश लोकशाहीची जननी मानला जातो. ती सशक्त ठेवण्यासाठी युवकांनी राजकीय सहभाग वाढवला पाहिजे. गेल्या काही वर्षांत घराणेशाहीने देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे युवा पिढी राजकारणात आली, तर घराणेशाही कमी होऊन घराणेशाहीचा बीमोड शक्य हाेईल, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी युवकांसमोर केले.
स्वामी विवेकानंद यांच्या १६१व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या २७व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे शानदार उद्घाटन शुक्रवारी तपोवनात करण्यात आले. यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच केंद्रीय माहिती प्रसारण युवक कल्याण व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, क्रीडा राज्यमंत्री निसीथ प्रमाणिक आदी उपस्थित होते.
भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. भारतीय संशोधकांची विक्रमी पेटंट नोंदवली जात आहेत. उत्पादन क्षेत्रात जगातील सर्वांत मोठा हब भारतात तयार होत आहेत. या सर्व प्रगतीमागे युवा शक्ती हीच महत्त्वाची आहे, असे मोदी म्हणाले. विकास आणि वारसा या दोन्हींचे एकत्रित संवर्धन करायचे आहे, असेही मोदी म्हणाले.
मंदिरासाठी मोदींचे ११ दिवसांचे अनुष्ठान; काळाराम मंदिरातून स्वच्छतेचा प्रारंभ
नाशिक: आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या रामभक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवाच्या यज्ञ आणि उपासनेसाठी आपल्याला स्वतःमध्ये दैवी चैतन्य जागृत करावे लागेल. यासाठी शास्त्रात उपवास आणि कडक नियम सांगितले आहेत. ज्याचे पालन जीवनाचा अभिषेक करण्यापूर्वी केले पाहिजे. त्यामुळे तपस्वी, महापुरुषांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार मी आजपासून ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू करत आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमध्ये केली.
हे माझे सौभाग्य आहे की मी नाशिक धाम पंचवटी येथून माझ्या ११ दिवसीय अनुष्ठानाची सुरुवात करत आहे. पंचवटी हे पवित्र स्थान आहे, जिथे भगवान श्रीरामांनी बराच वेळ घालवला, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यानंतर श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले, तसेच गोदामाईची आरती केली. यावेळी मंदिरात स्वत: स्वच्छता करून मंदिराच्या स्वच्छता पंधरवड्याचा प्रारंभ केला. युवा महोत्सवात बोलताना त्यांनी युवकांना राजकारणात सहभाग वाढविण्याचे व श्रमदानाने परिसरातील मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले.
मोदी की गॅरंटी...
- मोदी की गॅरंटी म्हणजे गरिबांना घर, महिलांचा विकास आहे. तुम्ही लिहून ठेवा आगामी काळात नारी शक्ती अभियानातून दोन कोटी महिलांना लखपती आम्ही बनविणाच.
- महाराष्ट्र सरकारने महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ केला. राज्यभरातून आलेल्या हजारो माता भगिनींचे आभार मानतो, असे ते नवी मुंबईतील कार्यक्रमात म्हणाले.
- महिला सशक्तीकरण अभियानाच्या लाभार्थी श्रीधा गणेश लष्कर, श्रीशा गणेश लष्कर या बहिणींसह आराध्या दत्ता लोंढे आणि रक्षिता सुजत शिंदे यांना पंतप्रधानांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
पंतप्रधानांचा रोड शो
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खारकोपर ते नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत रोड शो करण्यात आला. याशिवाय सभास्थळी छोटा ट्रॅक बनवण्यात आला हाेता. फुलांनी सजविलेल्या एका गाडीतून मोदी यांनी रोड शो केला.
- यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. सभा मंडपात चौघांनी हात उंचावून उपस्थित महिलांना अभिवादन केले.