नाशिकरोड : दोनवर्षांपूर्वी एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो असे सांगून इंदोर येथील ए प्लस एज्युकेशन कन्सल्टंटच्या दोघा चालकांनी नाशिकरोडच्या दोघा पालकांची १६ लाखांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल केला आहे. जय भवानीरोड मनोहर गार्डन येथे राहणारे प्रशिन भानुदास कुशारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीचे व मुक्तिधामजवळ राहणारे राजेंद्र देशमुख यांच्या मुलाचे दोन वर्षापूर्वी एमबीबीएसला अॅडमिशन घ्यावयाची होती. १९ जून २०१५ ते आॅगस्ट २०१५ या काळात कुशारे व देशमुख यांना त्यांच्या पाल्यांची एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो असे इंदूर येथील ए प्लस एज्युकेशन कन्सल्टंटचे संशयित नीरजकुमार सिंग, सौरभकुमार सिंग यांचे फोन आले होते. त्यानुसार कुशारे व देशमुख यांनी त्यांच्याशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतर प्रत्येक अॅडमिशनसाठी आठ लाख देण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कुशारे व देशमुख यांनी नाशिकरोडच्या कॉर्पोरेशन बॅँकेतून प्रत्येकी अडीच लाख असे एकूण पाच लाख रुपये कॉर्पोरेशन बॅँक विजयनगरच्या शाखेतील त्यांच्या खात्यावर आरटीजीएस मार्फत भरले. त्यानंतर कुशारे व देशमुख यांनी प्रत्येकी साडेपाच लाख असे एकूण ११ लाख रुपये रोखीने दिले. संशयित नीरजकुमार व सौरभकुमार सिंग यांनी १६ लाख रुपये मिळाल्यानंतर अॅडमिशन करून न देता फसवणूक केली. त्यानंतर कुशारे व देशमुख हे इंदोर गेले असता सिंग यांनी आपल्या ए प्लस एज्युकेशन कन्सल्टंटचा गाशा गुंडाळण्यात आल्याचे उघडकीस आले. मात्र त्यानंतर लागलीच फिर्यादी प्रशिन कुशारे हे नोकरीनिमित्त दुबईला गेले होते. कुशारे पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली सोळा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:17 AM