नाशिकरोड : जेलरोड येथील इमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूलमधील लहान विद्यार्थ्यांना जबर मारहाण प्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला प्राचार्य जयश्री रोडे यांनी मानसिक परिस्थिती चांगली नसल्याने लेखी खुलासा करण्याबाबत आठ दिवसांचा कालावधी मागितला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी यासंदर्भात पाच दिवसांनी खुलासा करावा, असे आदेश त्यांना दिले आहेत. इमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये १५ लहान विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला नाही, या कारणावरून ढोल वाजविण्याच्या काठीने वळ उठेपर्यंत जबर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी प्राचार्य जयश्री रोडे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी या घटनेची सखोल चौकशी करून आठ दिवसांत शाळेची मान्यता काढून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी प्राचार्य जयश्री रोडे, शिक्षिका बबिता राजपूत, अनिता राजपूत यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता शिक्षण उपसंचालकांकडे लेखी खुलासा करण्यासाठी पत्र दिले होते.
इमराल्डच्या प्राचार्यांनी मागितली मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:57 PM