नाशिक : महापालिकेच्या विषय समित्या गठित झाल्यापासून त्यांची अधिकारीवर्गाकडून कशाप्रकारे बोळवण सुरू आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा विधी समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आला. विधी, अतिक्रमण आणि बांधकाम वगळता अन्य खात्यांच्या अधिकाºयांनी बैठकीला दांडी मारल्याने संतप्त झालेल्या सभापती शीतल माळोदे यांनी ‘आम्ही भिंतींशी बोलायचे काय’ असा उद्विग्न सवाल केला, तर मनसेचे ज्येष्ठ सदस्य सलीम शेख यांनी सभात्याग करत प्रशासनाचा निषेध केला.विधी समितीची मागील बैठकही अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळेच तहकूब करण्यात आली होती. शनिवारी (दि.२) पुन्हा बोलाविलेल्या सभेलाही केवळ तीनच विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अर्धा तास प्रतीक्षा करूनही अधिकारी उपस्थित झाले नाहीत. अधिकाºयांच्या या गैरहजेरीबद्दल मनसेचे गटनेते व समितीचे सदस्य सलीम शेख यांनी कडक शब्दांत हजेरी घेतली. अधिकारी सोईस्कररीत्या गैरहजर राहत असल्याचा आरोप करत सलीम शेख यांनी अधिकाºयांना समितीचे कामकाजच चालवायचे नसेल तर समिती बरखास्त करून टाकण्याची मागणी केली. समितीच्या बैठकीला एकदा आयुक्तांनाच पाचारण करावे, म्हणजे समितीचे कामकाज कसे चालते, याचे दर्शन त्यांना होईल, असेही सलीम शेख यांनी सांगितले. विषयपत्रिकेवर प्रस्ताव देऊन महिन्याचा कालावधी लोटला तरी त्याची उत्तरे देण्यासाठी आस्थापना विभागाचा अधिकारी उपस्थित नसल्याने सलीम शेख यांनी अखेर प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला. सभापती शीतल माळोदे यांनीही अधिकाºयांच्या गैरहजेरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अधिकारीच हजर राहत नसतील तर आम्ही भिंतींशी बोलायचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, बैठकीत महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांच्या पॅनलवरील विधीतज्ज्ञांची मासिक सभा विधी समिती व विधी विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी नगररचना विभागातील न्यायालयात दाखल दाव्यांची माहिती सभापतींनी विचारली असता विधी विभागप्रमुख बी. यू. मोरे यांनी त्याबाबतीत एकत्रित माहिती पुढील सभेत देण्यात येईल, असे सांगितले. सलीम शेख यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या चौकशीसाठी समितीवर नेमलेल्या अधिकाºयांची माहिती मागविली होती. परंतु, सदर प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आस्थापना विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने सलीम शेख यांनी नाराजी व्यक्त केली.सदस्यांनाही गांभीर्य नाहीविषय समित्यांची अधिकाºयांना तमा नाही आणि सदस्यांनाही त्याचे गांभीर्य उरलेले नाही. अशी विदारक स्थिती आहे. विधी समितीच्या बैठकीला सभापती शीतल माळोदे यांच्यासह सलीम शेख, शरद मोरे, नयन गांगुर्डे, पूनम मोगरे हे पाचच सदस्य उपस्थित होते. कोरम पूर्ण होण्यासाठी चार सदस्यांची आवश्यकता असते. सुरुवातीला तीनच सदस्य उपस्थित होते. परंतु, सभा चालविण्यासाठी नंतर फोन करून शरद मोरे यांना बोलाविण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर सभेला सुरुवात झाली. अन्य सदस्यांनी तर दांडीच मारली.
सभापतींचा उद्विग्न सवाल : अधिकाºयांच्या गैरहजेरीमुळे सलीम शेख यांचा सभात्याग ...आम्ही भिंतींशी बोलायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:12 AM
महापालिकेच्या विषय समित्या गठित झाल्यापासून त्यांची अधिकारीवर्गाकडून कशाप्रकारे बोळवण सुरू आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा विधी समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आला.
ठळक मुद्देसभात्याग करत प्रशासनाचा निषेध कारवाई करण्याचे निर्देश