मालेगाव: तालुक्यातील मुंगसे कांदा खरेदी विक्री मार्केटमध्ये कांदा लिलाव झाल्यानंतर खळ्यात खाली करण्यासाठी दिला असताना ८ लाख २८ हजार ३६ रुपये किमतीच्या सुमारे २८९ क्विंटल ३२ किलो कांद्याचा अपहार केल्याप्रकरणी तालुका पोलिसात ठगबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुंगसेतील व्यापारी रामराव धर्मा सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. पोलिसानी कल्पेश राजाराम अहिरे (३०) रा. तिसगाव ता. देवळा , नागेश्वर संजय हिरे (२१) रा. झाडी ता. मालेगाव, योगेश भागचंद सावकार (२४) संतोष निवृत्ती फसाले रा. रा. झाडी यांचे विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसानी तिघांना अटक केली आहे. जानेवारीपासून २६ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. चौघा आरोपीनीं संगनमत करून मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रात वेळोवेळी त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी त्यांच्या खळ्यात कांदा खाली करण्यासाठी आरोपींकडे मोठ्या विश्वासाने दिला. आरोपींनी कांदा माल खाली न करता खरेदी केलेल्या मालापैकी सुमारे ८ लाख २८ हजार ३६ रुपयांचा कांदा मालाची परस्पर स्वत:चे फायद्यासाठी अपहार करून व्यापारी व फिर्यादी यांचा विश्वासघात केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक मोहित मोरे करीत आहेत.
आठ लाखांच्या कांद्याचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:24 AM