नाशिक : जिल्ह्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही ऑक्सिजनची आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन बेड रिकामे झाले असूनही ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झालेला नसल्याने नवीन गंभीर रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिला जात आहे. जिल्ह्यात एकीकडे ऑक्सिजनची टंचाई तर जिल्ह्यातील रुग्णालयांना केवळ ९२ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा झाल्याने बहुतांश गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कुणीच वाली उरला नसल्यासारखी स्थिती झाली आहे.
जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनच्या तुलनेत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करणे जिल्हा प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. मात्र, निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन इतकाच साठा बाहेरुन मागवावा लागत आहे. त्यात मुरबाड आणि चाकण येथून येणाऱ्या ऑक्सिजनच्या टँकरसाठीच्या कालावधीत वाढ होऊ लागल्याने जिल्ह्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनची स्थिती रुग्णालयांच्या व्यवस्थापनासह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मनस्ताप देणारी ठरत आहे. जिल्ह्यातील नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील १४८, ग्रामीण भागातील ७० व मालेगावमधील ३४ अशा एकूण २५२ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारीच दिले होते. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने औद्योगिक विकास महामंडळांतर्गत बंद असलेल्या कंपन्यांकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून घेत ते सिलिंडर उत्पादक कंपन्यांना देण्यात यावेत, ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करताना उत्पादक कंपन्यांना अडचण येणार नाही, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देऊनही त्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत वाढत्या रुग्णसंख्येला आणि त्यापेक्षाही अधिक गतीने वाढत असलेली ऑक्सिजनची मागणी कशी पूर्ण करायची, हाच प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
इन्फो
रुग्ण रिक्षातून, रुग्णवाहिकेमधून रुग्णालयांच्या दारोदार
दिवसभरात प्रचंड फोनाफोनी करुनही रुग्णांसाठी शासकीय, मनपा किंवा खासगीतही ऑक्सिजन बेडबाबत कुठेच दिलासा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना घेऊन त्यांचे कुटुंबीय रिक्षातून किंवा रुग्णवाहिकेमधून जिल्हा रुग्णालयापासून मनपा रुग्णालयांमध्ये फिरत असूनही त्यांना बेड मिळेनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत मग काही रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात किंवा संबंधित रुग्णालयांच्या बाहेरच बेड मिळेपर्यंत थांबून राहात असल्याचे भीषण वास्तव आहे.
इन्फो
शुक्रवारी केवळ ९२ रेमडेसिविर
जिल्ह्यात जिथे दररोज पाच हजारांहून अधिक रुग्णांना रेमडेसिविरची गरज असताना, गुरुवारी केवळ ९२ रेमडेसिविरचा पुरवठा झाला. एकेका रुग्णालयालाही यापेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन लागत असताना प्राप्त झालेली इतकी अत्यल्प इंजेक्शन्स म्हणजे गरजू रुग्णांच्या जीवाशी खेळच आहे. अन्न व औषध विभागाकडे शुक्रवारी अजून एक हजार रेमडेसिविरचा पुरवठा होण्याची शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत हा पुरवठाच न झाल्याने रुग्णालयांनाही रेमडेसिविर मिळू शकले नसल्याने रुग्णालयांचाही नाईलाज झाला आहे.
इन्फो
बेड संपल्याने काही रुग्णांना खुर्चीत बसवून ऑक्सिजन
जिल्हा रुग्णालयातील सर्व ऑक्सिजन बेड संपुष्टात आल्याने प्रशासनदेखील हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात काही कोविड रुग्णांना बेडऐवजी अखेर खुर्च्यांवर बसवून ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसत असले, तरी ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांना जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने काही रुग्णांना अशाप्रकारे ऑक्सिजन देण्याची वेळ जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनावर आली आहे.