नाशिक : महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. या सभेत महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री सतेज पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी तलवारबाजीच्या सुविधा देण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
या सभेसाठी भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, महासंघाचे खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, उपाध्यक्ष शेषनारायण लोढे, सचिव डॉ. उदय डोंगरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक डॉ. दिनेश वंजारे, राजू शिंदे याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या २९ जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यात झालेल्या या सभेला संबोधित करताना महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतेज पाटील यांनी सांगितले की, तलवारबाजी हा खेळ महाराष्ट्रात सर्वांना परिचित असला तरीही महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या खेळाच्या अद्ययावत सुविधा पुरविण्याचे काम येत्या एक - दीड वर्षांमध्ये केले जाईल. मी विविध खेळांच्या कार्यप्रणालीशी परिचित आहे. परंतु, तलवारबाजी असोसिएशनने खेळाचे गेल्या २० वर्षांचे सर्व प्रकारचे रेकॉर्ड अगदी योग्य स्वरूपात जतन केले असल्याबाबत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्राच्या आठ विभागांमधे तलवारबाजीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे किमान एक प्रशिक्षण केंद्र वर्षभरात सुरू केले जाईल असे सांगितले. यावेळी भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष तथा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले.