दरम्यान, राज्य शासनाने एकसदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा केली असली तरी सत्तारूढ महाआघाडीतून त्याला विरोध असून त्यामुळे व्दिसदस्यीय प्रभाग किंवा त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय बुधवारी (दि.१५) मंत्रिमंडळ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपणार आहे. त्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेला प्रारंभ झाला असून त्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
यापूर्वीच्या प्रभाग रचनांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहितादेखील लागू करण्यात आली आहे. महासभा, स्थायी समिती, प्रभाग समित्यांच्या सभा वगळता महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या दालनात होणाऱ्या अनौपचारिक बैठकांसाठी उपस्थित राहण्यास या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महापालिकेतील महासभा, स्थायी समितीची बैठक, प्रभाग समिती यासाठीच केवळ उपस्थित राहण्यास अनुमती देण्यात आली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या अनौपचारिक बैठकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजाच्या तक्रारींवर नियमांनुसारच कार्यवाही करण्याचे आणि निवडणुका निर्भय, पारदर्शकरीत्या पार पडण्यासाठी खबरदारीच्या सूचनादेखील निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
इन्फो...
आज मंत्रिमंडळ निर्णय
महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी राज्यातील मुंबई वगळता सर्व महापालिकेचे एकसदस्यीय प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले असले तरी ते सत्तारूढ आघाडीतच याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहे. त्यामुळे आता दोन किंवा तीन सदस्यांची प्रभाग रचना करण्याबाबत मंत्रिमंडळ बुधवारी (दि.१५) निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.