सिडको : पावसाळ्यामध्ये सिडको भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, पावसाने उघडीप दिल्यानंतरही महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत या कारणावरून सोमवारी (दि.२६) संतप्त झालेल्या सिडको कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपअभियंता रौंदळ यांना खड्ड्यांचे पुस्तक भेट देत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला.मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात सिडको ब्लॉक कॉँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे उपअभियंता रौंदळ यांना सिडको भागातील सध्याची परिस्थिती असलेले फोटो काढून त्याचे पुस्तक तयार करून भेट देण्यात आले. यंदाच्या वर्षी पावसामुळे सिडको तसेच अंबड औद्योगिक वसाहतीतील संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावेत, याबाबत कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाºयांना सांगूनही रस्त्यांची डागडुजी करण्यात आली नाही. बडदेनगर येथील सपना थिएटरसमोरील रस्ता, कर्मयोगीनगर याबरोबरच अंबड औद्योगिक वसाहत, उंटवाडी, त्रिमूर्ती तसेच सिडको विभागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत पुस्तक भेट देण्यात आली. याप्रसंगी सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, संतोष ठाकूर, उपाध्यक्ष भरत पाटील, माणिक जायभावे, सुभाष पाटील, अर्जुन देवरे, धोंडीराम आव्हाड, जयेश पोकळे, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.पावसामुळे मुख्य तसेच अंतर्गत स्त्यांवरील खड्ड्यात दुचाकी आदळून मणक्यांचे आजार वाढत आहे. तसेच जे खड्डे भरले ते रोलिंग केलेला नसल्यामुळे ती खडी रस्त्यावर येऊन अपघात होत आहेत. मनपाने लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशाराही कॉँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
सिडकोत खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:30 AM