नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही काल (दि.१८) सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांची कार्यवाही सुरूच होती. दुपारच्या सत्रात मुख्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने बदल्यांच्या कार्यवाहीत काही वेळ अडथळा आला. विजेचा पुरवठा खंडित झाल्याने बदलीपात्र कर्मचाऱ्यांची आकडेवारी प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली नसल्याचे कळते. नियोजित वेळापत्रकानुसार काल(दि.१८) सामान्य प्रशासन विभाग, पशुसंवर्धन विभाग,पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग या चार विभागांतील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार होती. त्यानुसार सकाळी सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, विस्तार अधिकारी (सा)वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक या पदांच्या प्रशासकीय २८, तर विनंती स्वरूपातील ४३ अशा एकूण ७१ बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार होती. प्रत्यक्षात कक्ष अधिकाऱ्यांच्या बहुतांश बदल्या या दुर्धर आजार व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी या कारणास्तव झाल्याच नसल्याचे समजते. तर कार्यालयीन अधीक्षकांचीही बदल्यांच्या संख्येची आकडेवारी याच कारणांनी रखडल्याची चर्चा आहे. वरिष्ठ सहायकांच्या बदलीत चांदवडहून नाशिकला तीन वर्ष सेवा पूर्ण नसलेल्या एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे, तर एका ५३ वर्षीय कर्मचाऱ्याला त्याच्या विनंतीनुसार मात्र बदली नाकारण्यात आल्याचे कळते. सायंकाळनंतर सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्यांची कार्यवाही संपल्यांवर अर्थ विभागाच्या बदल्यांची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे कळते. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू
By admin | Published: May 19, 2015 1:14 AM