लोहोणेर : दोन वर्षा पासून बंद असलेला वसाका कारखाना सुरू व्हावा म्हणून कामगार संघटना व भाडेकरू संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे बुधवारी व्यवस्थापन मंडळाने परिपत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही कर्मचारी गुरुवारी(दि.१०) सकाळी प्रत्यक्ष कामावर हजर झाल्याने सन २०२०-२१ चा वसाकाचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या कामगाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
वसाका कारखाना कर्जबाजारी पणामुळे बंद पडला असल्याने युती शासनाच्या काळात आ. डॉ. राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून डिव्हिपी ग्रुपच्या धाराशिव युनिटला भाड्याने देण्यात आला होता. मात्र मागील थकीत देणे वरून कामगार संघटना व भाडेकरू संस्था यांच्यात वाद निर्माण झाल्याने सदर कारखाना बंद पडला होता. आता वसाकाची चाके पुन्हा एकदा सुरू व्हावीत यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर, व्यवस्थापकीय मंडळ व कामगार संघटना यांच्यात पुढील करार अबाधित रहावा म्हणून सर्वांचेच प्रयत्न सुरू होते.
याबाबत कामगार संघटना नेते व भाडेकरू संस्था यांच्यात आ. डॉ.राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बैठक होऊन प्रलंबित असलेल्या करारावर चर्चा होऊन अवसायक राजेंद्र देशमुख यांच्या समोर यशस्वी तोडगा काढण्यात आला असल्याने दि ९ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकला प्रतिसाद देत गुरुवारी (दि.९)वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुमारे तीनशे कामगारांनी आपली हजेरी लावत फॅक्टरी विभागातील काही कामगारांनी मशीनरीच्या सफाईच्या कामास सुरु वात केल्याने आगामी २०२०-२१ दरम्यानचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान भाडेकरू संस्था व कामगार संघटना यांच्यात मागील थकीत देणे बाबत विशेष बोलणे झाले असून याबाबत कामगार नेते मात्र चांगलेच उल्हासीत झाले आहेत. वसाका कार्यस्थळावर बुधवारपासून धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, संचालक संदीपान खारे, संतोष कांबळे, आबासाहेब खारे, संजय खरात, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांच्यासह युनियनचे पदाधिकारी, कामगार व अधिकारी वर्ग याची वर्दळ दिसून आली.चौकट ...१) बंद अवस्थेत असलेला वसाका सुरू करण्यासाठी भाडेकरू संस्था व कामगार संघटना यांच्यात झालेल्या यशस्वी बोलणीमुळे यंदाचा हंगाम सुरू करण्यात येणार असून याची तयारी म्हणून आज पासून कामगार आपापल्या कामावर हजर झाली आहेत. मागील थकीत रक्कम मिळणे बाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून वसाका सुरू करण्याबाबत कामगारां कडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.- अशोक देवरे, अध्यक्ष, वसाका कामगार युनियन.२) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वसाका सुरू होण्याच्या दृष्टीने आजचा सामंजस्य करार हा मैलाचा दगड आहे. वसाका व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात कोणताही वाद होऊ न देता वसाकाला पुनरवैभव मिळवून देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.- आ. डॉ. राहुल आहेर.३) वसाका चालू होणे ही कामगाराच्या दृष्टीने आवश्यक होते. आ. डॉ. राहुल आहेर यांच्या मध्यस्थीने कामगार व व्यवस्थापन यांच्यात यशस्वी तडजोड झाली संघर्षाला यश मिळाले याचा आनंद आहे.- कुबेर जाधव, कार्याध्यक्ष वसाका कामगार संघटना४) वसाका गतिमान करण्यासाठी आमचा प्रत्येक घटक प्रयत्नशील आहे. शेतकरी, कामगार, सभासद याचे सहकार्य आम्हास अपेक्षति आहे.- अभिजित पाटील, चेअरमन, धाराशिव कारखाना.