----
इंदिरानगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये बसून भोजन करण्यावर बंदी घातलेली असताना समर्थनगर भागातील एका हॉटेलमध्ये बळजबरीने जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या सराईत गुंडांची छायाचित्रे मनपाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी काढली असता या गुंडांनी त्यांना मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. बुधवारी (दि.७) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान समर्थनगर येथील कट्टी-बट्टी नावाचे हॉटेल सर्रासपणे सुरू होते. तेथे काही ग्राहक आतमध्ये बसून भोजनही करत होते. ही बाब सिडको मनपा विभागीय कार्यालयाच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना समजली असता त्यांनी संबंधित हॉटेलमधील व्यवस्थापकाला समज देण्याचा प्रयत्न सुरू केला त्यावेळी पाठीमागून आवाज येत असल्याने रोहित निकमसह कर्मचारी त्या ठिकाणी गेले असता चार इसम जेवण करताना आढळून आले. त्यांनी या इसमांचे छायाचित्र काढले व संबंधित कर्मचारी बाहेर आले. दरम्यान, जेवण करीत असलेले ग्राहक बाहेर आले आणि त्यानी 'आमचे छायाचित्र का काढले' असा जाब फिर्यादी रोहित निकम यांना विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या दुचाकींची तोडफोड केली. निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी सराईत गुन्हेगार संशयित हरी प्रसाद जोशी व संकेत चंद्रात्रेसह त्याच्या अन्य दोन साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.