नाशिक : येथील प्रीमियम टूल्स कंपनीतील कामगारांना व्यवस्थापनाने गेल्या आठ महिन्यांपासून वेतन न दिल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या कामगारांनी सीटू भवन येथे धाव घेऊन डॉ. कराड यांच्याकडे साकडे घातले आहे.पूर्णपणे निर्यातक्षम असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल्स कंपनी २०१४ पासून डबघाईस आली आहे. काही दिवस हा कारखाना बंद पडला होता. व्यवस्थापन आणि सीटू युनियन यांच्या सामूहिक प्रयत्नाने या कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरू झाले आहे. या कारखान्यात १०० टक्के नसले तरी ३० ते ३५ टक्के उत्पादन काढले जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून व्यवस्थापनाने कामगारांचे वेतन थकविले आहे. तसेच गेल्या २० महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या वेतनातून कपात केलेला पीएफ निधी, सोसायटीचे कर्ज भरलेले नाही. विमा पॉलिसीचे हप्ते थकल्याने मेडिक्लेम मिळण्यास अडचणी येत आहेत. कर्जाचे हप्ते वेळेवर पोहोचत नसल्याने जप्तीची कारवाई केली जात आहे. पाल्यांच्या शिक्षणाचे हाल होत आहेत, अशी कैफियत कैलास जाधव, प्रमोद पाटील, संभाजी साळुंखे आदींसह कामगारांनी सीटू भवन येथे धाव घेऊन सीटू युनियनचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्याकडे मांडली आहे.