लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी. तसेच या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी (दि.२) जिल्हा परिषदेच्या आवारात दुपारी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या पदाधिकाºयांनी द्वारसभा घेतली. या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील एक कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या प्रशासकीय कामकाजाला कंटाळून ३० जुलै रोजी आत्महत्या केली. प्रशासकीय कामकाजाच्या माध्यमातून टाकून बोलणे, अशासकीय भाषा वापरणे या प्रकारचा गुरव यांना त्रास होत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून नाशिक जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी बुधवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. तसेच भोजनकाळात द्वारसभा घेत निषेध केला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी विजयकुमार हळदे, रवींद्र देसाई, वसंत डोंगरे, संजय पूरकर, प्रशांत कवडे, संदीप गावंडे, श्रीपाद जोशी, चंद्रशेखर फसाळे, अजित आव्हाड, उदय लोखंडे आदी उपस्थित होते.
कर्मचारी आत्महत्याप्रकरणी जिल्हा परिषदेत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 12:52 AM