महिला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सत्कारनाशिक : पोलिसाची नोकरी व कुटुंब यांची यशस्वीपणे सांगड घालून उल्लेखनीय कार्य अर्थात गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास, खेळातील नेत्रदीपक कामगिरी, समुपदेशनाद्वारे मोडणारे संसार वाचविणे याबरोबरच विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ निमित्त होते जागतिक महिला दिनाचे़ दरम्यान, सकाळी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाइक रॅली तर दुपारी इनडोअर शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़पोलीस आयुक्तालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे वरिष्ठांसमोर सादरीकरण केले़ त्यामध्ये काहींनी गायन, वादन, नृत्य सादर केले तर काहींनी महिला सबलीकरण व स्त्रीशक्तीविषयावर संवाद साधला़पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना, महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे़ पोलीस दलातील महिला कर्मचारी अधिकारी केवळ आपले कुटुंबच सांभाळत नाहीत तर जटिल गुन्ह्यांचा यशस्वी तपासही करतात़ याबरोबरच विविध खेळांमध्ये नाशिक पोलीस दलाची मान उंचावत असून, मोडणाऱ्या कुटुंबांना समुपदेशनाद्वारे वाचवत आहेत़ पोलीस दलातील महिलांचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले़या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गिर्यारोहक कृष्णा पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त हरविंदर कौर, शांती राधाकृष्णन बी, दीपाली खेडकर, जया ढवले यांसह उपायुक्त दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाशकात महिला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार
By admin | Published: March 08, 2017 10:11 PM