नाशिक : महापालिकेत कधी नव्हे ते दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, रवि पाटील बेपत्ता प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सदर कामकाजात सुधारणा न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापौरांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे. कामगार सेनेचे अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी निवेदनात म्हटले आहे, गेल्या पाच दिवसांपासून महापालिकेतील सहायक अभियंता रवि पाटील हे अतिकामाच्या ताणामुळे बेपत्ता झाले आहेत. पाटील यांच्याप्रमाणेच महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारीदेखील गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड ताणतणावाखाली काम करताना दिसून येत आहेत. परंतु प्रशासकीय कारवाईच्या भीतीने कुणी पुढे येत नाही. महापालिकेत अशा प्रकारचे दहशतीचे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते. त्यातच रवि पाटील प्रकरणामुळे कर्मचाºयांची मानसिकता आणखीणच ढासळली आहे. रवि पाटील यांच्याप्रमाणेच टोकाचे पाऊल अन्य कुणीही उचलू नये, यासाठी वेळीच कामकाजात सुधारणा होणे अपेक्षित आहे. कामकाजात सुधारणा न झाल्यास काम बंद आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. कामगार सेनेने पोलीस आयुक्तांनाही निवेदन देत रवि पाटील यांची शोधमोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची मागणी केली आहे.निवेदन महापौरांनाकामगार सेनेने सदर निवेदन हे महापौरांना दिले आहे. वास्तविक प्रशासकीय कामकाज हे आयुक्तांच्या नियंत्रणाखाली चालते. त्यामुळे प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तांच्या नावे निवेदन देणे आवश्यक होते. परंतु, कामगार सेनेने महापौरांना निवेदन दिले आहे. रवि पाटील बेपत्ता होऊन पाच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर कामगार संघटना काहीच पुढाकार घेत नसल्याची टीका होऊ लागल्यानंतर कामगार सेनेला उशिराने जाग आली. परंतु त्यातही आयुक्तांना निवेदन देण्याचे धाडस कामगार सेनेने दाखविले नसल्याने त्याबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नाशिक महापालिकेत कर्मचारी दहशतीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:57 AM