ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 18 - कळवण तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सुनील गांगुर्डेला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरूण ढवळे यांनी बुधवारी दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 25 दिवसांच्या कारावासाचीही शिक्षा सुनावली आहे. एप्रिल 2015 मध्ये कळवणजवळ ही घटना घडली होती़.
कळवण तालुक्यातील एक अल्पवयीन युवती महाविद्यालयीन शिक्षणासाठी बसने ये-जा करत होती. एप्रिल 2015 मध्ये आरोपी गांगुर्डे याने या युवतीशी ओळख वाढवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली. यानंतर या युवतीला कळवणमधील एका स्त्री रोग तज्ज्ञाकडे नेऊन उपचार केले. या प्रकरणी पीडित युवतीने कळवण पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गांगुर्डेविरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) तसेच बलात्कार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित अल्पवयीन मुलीची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता. ती बारा ते चौदा आठवड्यांची गर्भवती असल्याचे तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. या खटल्यात सरकारी वकील विद्या जाधव यांनी गांगुर्डेविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. या पुराव्यानुसार जिल्हा न्यायाधीश ढवळे यांनी गांगुर्डे यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.