नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.
सेवायोजना नोंदणीकृत उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यातील मुलाखती मोबाइल, दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतल्या जाणार असल्याची माहीती जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता केंद्राकडून देण्यात आली आहे. नियोक्त्यांकडून रिक्तपदे व त्याविषयी आवश्यक पात्रता याविषयीची माहिती वेबपोर्टलवर ऑनलाइन प्रसिद्ध केली जाणार आहेत. सेवायोजना नोंदणी केली नसल्यास संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून महास्वयंम हे ॲप डाउनलोड करून नोंदणी करण्याच्या सूचनाही केंद्राकडून करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. तसेच अनेक कामगार स्थलांतरित झाले होते. त्यामुळे या मेळाव्यास महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, भरती इच्छुक नियोक्त्यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे वेबपोर्टलवर त्यांचेकडील रिक्तपदे जनरल, ईपीपी, ॲप्रेंटिस याविषयीची माहिती अध्यावत करण्याच्या सूचनाही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त तडवी यांनी केले.