नांदगाव : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) अंतर्गत नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून जिल्ह्यात येवला, पेठ या तालुक्यानंतर तीन क्रमांकाची मजूर संख्या येथे आहे. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना कामांमुळे रोजगार मिळाला आहे.
तालुक्यात ८९ ग्रामपंचायती असून २९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात कामे सुरू आहेत. कामांची संख्या २८९ असून त्यावर १२४३ मजूर काम करत असल्याची माहिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली. तालुक्यात घरकुल, गोठा शेड, वैयक्तिक विहीर, खोलीकरण, शिवार रस्ता अशी विविध कामे सुरू आहेत.
जेव्हा ग्रामीण भागात शेतीची कामे नसतात किंवा शहरात उद्योगधंदे बंद असतात, त्याठिकाणी काम करणारे कामगारांना एमआरईजीएसमुळे आर्थिक दिलासा मिळतो. कामाचा प्रतिदिन २४८ रुपये मोबदला मिळतो. तसेच घर बांधणे, बैलांसाठी गोठा शेड, विहीर खणणे, विहिरीचे खोलीकरण,शिवार रस्ता यातून अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध होतात. कामांचे स्वरूप ग्रामीण भागाच्या विकासासाठी उपयुक्त आहे.
--------------
मागेल त्याला काम
या योजनेत मागेल त्याला काम अशी संकल्पना असून मजुरांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करावयाची व त्यांनी ती गटविकास अधिकारी यांचेकडे पाठवायची. त्यानंतर शहानिशा करून काम देण्यात येते. अनेकदा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा वजनदार व्यक्ती यांचेकडे जेसीबी मशीन, ट्रक्टर किंवा तत्सम यांत्रिकी उपकरणे असतात. ती डोळ्यांसमोर ठेवून कामाची मागणी केली जाते. मागणी मंजूर झाली तर यांत्रिकी पद्धतीने काम करण्यात येते. सदर योजना १०० टक्के मजुरांसाठी असल्याने प्रशासन व ग्रामपंचायत यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवत असतात. याची उदाहरणे आहेत. रोजगार हमी अंतर्गत बोलठाण गावात शिव रस्त्याच्या कामामुळे हातांना काम व कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे.