नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौरादी मंडळींचे मतभेद पराकोटीला जात असल्याचे दिसत असताना मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्यात कृष्णशिष्टाईचा प्रयत्न केला आहे. उभयतांनी गुण्यागोविंदाने शहराचा कारभार हाकण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर तसेच सभागृह नेता दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरूस्कर यांच्यात मंगळवारी दुपारी आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्यात हा समेटाचा प्रयत्न झाल्याचे समजते. आयुक्त विश्वासात घेत नाहीत तसेच लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव परत पाठवतात किंवा अमान्य करतात येथपासून करवाढीस विरोध करणारे हेच लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या कामांचे प्रस्ताव आपल्याकडे पाठवत असल्याचे आयुक्तांनी सांगितल्याचे समजते.विरोधी पक्ष हे सत्ताधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. त्याचवेळी आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची तर लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना सन्मानाची वागणूक द्यावी, अकारण टिप्पणी करणे टाळावे, अशी चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.संघर्ष टाळण्यासाठीच...महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष वाढत असून, आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याच्या चर्चा झडत आहेत. इतकेच नव्हे तर संपकरी कर्मचारीसंघटनांना महापौरांसह अन्य पदाधिकाºयांनी पाठिंबा दिल्याने शहरात वेगळे चित्र निर्माण होत आहे. महापालिकेत आणि राज्यात भाजपाची सत्ता असतानाही अशाप्रकारचे संघर्ष दिसून येत असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
आयुक्तांशी तडजोडीसाठी आमदारांची शिष्टाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:10 AM