चांदवड : शहरात सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजार तळातील शेतकरी व फळ विक्रेते व व्यापारी यांच्या बसण्याचे नियोजन करावे कारण सध्या पाइपलाइनचे काम सुरू असल्याने बरेच भाजीविक्रेते चांदवड -मनमाड- लासलगाव या रस्त्याच्या कडेला बसत असल्याने या रस्त्यावरील अवजड वाहने जाण्या-येण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे बराच काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते.
यासाठी चांदवड नगर परिषदेने त्वरित नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ राऊत, राजकुमार संकलेचा, अल्ताप तांबोळी यांच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, मुख्य अधिकारी अभिजित कदम यांची भेट घेऊन केली. चांदवड येथे भरणारा सोमवारचा भाजीपाला बाजारासाठी जिल्हाधिकारी व शासनाने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी अधिकृत जागा दिली असून सदर जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी आपला माल घेऊन चांदवड -लासलगाव - मनमाड रोडवर बसत असल्याने वाहतुकीला खोळंबा होत असून येथे अपघाताची शक्यता आहे. मुख्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बाजारतळात जाऊन पाहणी करून शेतकरी व व्यापारी यांनी रस्त्यावर न बसता त्यांचे योग्य नियोजन करावे व पुढील अनर्थ घडू नये यासाठी लक्ष घालावे, असे निवेदनात म्हटले आहे. तर बाजार तळावर झालेल्या अतिक्रमणावर योग्य तो निर्णय घ्यावा, असेही निवेदनात राऊत, संकलेचा, तांबोळी यांनी म्हटले आहे.