शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे खंदक बुजवून खंदकसह परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणासंदर्भात सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत लोकायुक्तांनी सुनावणी दरम्यान प्रशासनावर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर व होणाऱ्या सुनावणीच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी (दि.१८) जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या स्थळ पाहणीनंतर महापालिका, पोलीस, महसूल विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात अतिक्रमणाचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे. यावेळी नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त दीपक कासार, नितीन पोफळे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, उपायुक्त नितीन कापडणीस, नगररचना विभागाचे संजय जाधव आदी उपस्थित होते.
इन्फो
..तर शाळेचेही अतिक्रमण हटवू
बैठकीनंतर मांढरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, किल्ला परिसरात अतिक्रमण झाले आहे. पूर्वी सर्व्हे क्रमांक २४० होता, आता तो सिटी सर्व्हे क्रमांक १०९ झाला आहे. सदर जमीन शासकीय असल्याने शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणचे अतिक्रमण हटविले जाईल. यापुढे अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, तसे निर्देश मनपा व महसूल विभागाला दिले आहेत. स्थळ पाहणी अहवाल लोकायुक्तांकडे सादर केला जाईल. किल्ला परिसरातील शाळेला १९६१ साली नियमानुसार जागा दिली आहे. त्यांनी अतिक्रमण केले असेल तर अतिक्रमण काढण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.