इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा-पाथर्डी रस्ता दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आला. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटी यादरम्यान नागपूरच्या धर्तीवर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात येऊन पादचाºयांना दुतर्फा पदपथही तयार करण्यात आले. परंतु कलानगर ते पाथर्डीगाव यादरम्यान रस्त्याचे काम झाले नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. याची दखल घेत सुमारे पाच वर्षांपूर्वी कलानगर ते पाथर्डीगाव रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. कलानगर ते पाथर्डीगाव यादरम्यान असलेल्या दुभाजकांमध्ये खजुराचे वृक्ष आणि लहान लहान शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. यादरम्यान विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी यांसह विविध उपनगरे असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु या रस्त्यावर असलेल्या दुभाजकांवर काही व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे लोखंडी व कापडी फलक ठेवले आहेत. त्यामुळे दुभाजक जाहिरात फलकांसाठी की वाहनांच्या नियंत्रणासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर फलकांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:25 AM