नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नाशिक पूर्व विभागातील अमरधामच्या लगत मनपाच्या मोकळ्या जागेत सुमारे २० ते २२ कुटुंबीयांनी पत्र्याचे शेड उभारून केलेले अतिक्रमण उद्ध्वस्त केले. रहिवाशांनी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर अनधिकृत बांधकाम उभे केले होते. पोलीस बंदोबस्तात सदर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २९ मधील अमरधामच्या लगत महापालिकेच्या मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकामाकडे मंगळवारी आपला मोर्चा वळविला. पोलिसांचा फौजफाटा घेत पथकाने सदर जागेत रहिवाशांनी अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड, घरे, झोपड्या तसेच अमरधाम रोडलगत पत्र्याचे शेड उभारून थाटलेली दुकाने, घरे यांच्यावर जेसीबी चालविला. सुमारे २५ शेड बांधकामे हटविण्याची कार्यवाही पथकाने केली. यावेळी काही रहिवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांच्या फौजफाट्यापुढे त्यांचा विरोध मावळला. महापालिकेमार्फत सुरू असलेली ही कारवाई पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सदर कारवाईप्रसंगी महापालिकेचे विभागीय अधिकारी नितीन नेर, वसुधा कुरणावळ, चेतना केरुरे तसेच नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. घुगे, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एम. डी. पगारे हे उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.(प्रतिनिधी)
अतिक्रमण उद्ध्वस्त
By admin | Published: February 09, 2016 11:25 PM