सातपूर : गंगापूररोडवरील आसारामबापू आश्रमाने महापालिकेच्या रस्त्यालगत केलेल्या अतिक्रमणावर पालिकेने शुक्रवारी जेसीबी चालवत अतिक्रमण उद््ध्वस्त केले. पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलेल्या या अतिक्रमणात कुटीया, पत्र्याचे शेडस्, पक्के बांधकाम यांचा समावेश होता. सुमारे तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. गेल्यावेळी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविणारे साधक यावेळी पुढे न आल्याने पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सहजगत्या कारवाई पार पाडता आली. गंगापूररोडवरील आसारामबापू आश्रमाने महापालिकेच्या डीपी रोडवर मोठ्या प्रमाणावर शेडस्, पक्के बांधकाम करत अतिक्रमण केले होते. वर्षभरापूर्वी महापालिकेने पहिल्यांदा आश्रमाने केलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालविला होता. त्यावेळी शेकडो साधकांनी विरोध प्रदर्शन करत पथकाला मागे सारले होते. आश्रमातील एका मोठ्या वटवृक्षाभोवती महिला साधकांनी गराडा घातल्याने पालिकेला कारवाईत अडथळे आले होते. वर्षभरात आश्रमाने पुन्हा एकदा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अतिक्रमणावर जेसीबी चालविण्यास सुरुवात केली. पोलीस बंदोबस्तात सुमारे ८० कर्मचाऱ्यांनी २०० फूटाचे तारेचे कंपाउंड, रस्त्यातच बांधलेले मंदिर, झाडाच्या अवतीभोवती बांधलेला ओटा, दोन खोल्यांची कुटीया, पत्र्याचे शेड आदि अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटविण्यासाठी पाच जेसीबींचा वापर करण्यात आला. अतिक्रमण विभागाची कारवाई सुरु असताना साधकांनी मात्र गेल्यावेळी दाखविलेला विरोध न दाखविणेच पसंत केले. त्यामुळे पालिकेला कारवाई सुरळीत पार पाडता आली. पथकाने आश्रमालगतच असलेल्या गंगाजल नर्सरीने अनधिकृतपणे बांधलेले प्रवेशद्वारही हटविले. (वार्ताहर)
आसारामबापू आश्रमाच्या अतिक्रमणावर जेसीबी चालवत अतिक्रमण उद््ध्वस्त
By admin | Published: December 13, 2014 2:04 AM