सिन्नर : शहरात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी आडवा फाटा ते खासदार पूल परिसरातील सुमारे २० अतिक्रमणे हटवून पादचारी मार्ग मोकळा करण्यात आला.सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आडवा फाटा परिसरातून मोहीमेस सुरुवात करण्यात आली. एक जेसीबी मशीन, ट्रॅक्टर व पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांच्या मदतीने आडवा फाटा ते खासदार पूल या रस्त्याच्या फूटपाथवरील टपऱ्या, कच्ची बांधकामे अशी सुमारे २० अतिक्रमणे यावेळी हटविण्यात आली. सरस्वती नदीपात्रात पक्की बांधकामे करणाऱ्या अतिक्रमणधारकांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी रात्रभराची मुदत देण्यात आली. गुरुवारी पुन्हा याच भागात मोहीम राबविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शहरातील सर्व पादचारी मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याचे उच्च न्यायालय व राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सदर अतिक्रमण निर्मूलन मोहीम संपूर्ण सिन्नर शहरात राबविण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. जानेवारीत महिनाभर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)
नगरपालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 11:15 PM