इंदिरानगर : राजीवनगर झोपडपट्टीलगत महापालिकेने तयार केलेल्या शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यात आले असून, पादचाऱ्यांना फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे. दोन्ही महामार्गास जोडणारा हा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. राजीवनगर झोपडपट्टी एका खासगी जागेत असल्याने त्या ठिकाणी सुमारे आठशे ते हजार झोपड्या असून, त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून अनधिकृत झोपड्या बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शंभरफुटी रस्त्याचे काम अर्धवटस्थितीत पडून होते. अखेर सिंहस्थापूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन सुमारे साडेसहाशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या. परंतु अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करून दुतर्फा पदपथ तयार करण्यात आले असताना त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभरफुटी रस्त्यावरील पदपथावर सुमारे सत्तर ते ऐंशी अनधिकृत झोपड्या बसल्या असून, या रस्त्याचा वापर करणाºया पादचाºयांना पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. या अनधिकृत झोपडपट्टीतील लहान बालके रस्त्यावर खेळत असल्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करणेही जिकिरीचे झाले आहे.हातगाड्या रस्त्यावरप्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळेस धारेवर धरले तरीही प्रशासनाला जाग आली नसून, आता तर पदपथावरून सर्रास रस्त्यावरसुद्धा हातगाडे विक्रेत्यांच्या गाड्या लागण्यास सुरुवात झाली आहे.
राजीवनगर झोपडपट्टीतील फुटपाथवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:07 AM