गेल्या काही महिन्यांपूर्वी पंचवटी मनपा अतिक्रमण विभागाने साधूग्रामच्या जागेवरील शंभरहून अधिक अनधिकृत झोपड्या हटविण्याचे काम केले होते. झोपड्या हटविताना महिलांनी मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक करून दहशत निर्माण केली होती. या प्रकारानंतर मनपाच्या संबंधित अधिकारी वर्गाने आडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली खरी परंतु काही मनपा अधिकारी वर्गाने ऐनवेळी नमती बाजू घेतल्याने तक्रार न देता माघारी फिरण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. त्यानंतर झोपडपट्टीधारकांना सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत तयार केलेल्या एसटी स्टँड जागेत झोपड्या थाटल्या आहेत. शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधूग्रामसाठी जागा आरक्षित केली असून झोपडपट्टीधारक सदर जागेवर वारंवार अनधिकृत झोपड्या थाटून मनपासमोर आव्हान उभे करतात. वारंवार हटविण्यात आलेल्या झोपड्या पुन्हा थाटल्या गेल्या असल्या तरी सध्या अनधिकृत झोपड्यांकडे पालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
साधूग्राम जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:11 AM