नाशिक :शहरात प्रत्येक बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टी धारकांनी केलेले झोपडयांचे अतिक्रमण वारंवार हटविल्यानंतरही पुन्हा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांनी त्याच जागेवर अनधिकृत झोपडया व पाल उभारून अतिक्रमण केले आहे. परंतु या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील अतिक्रमण विभागाने काही महिन्यांपूर्वी साधुग्रामच्या जागेवरील शंभरहून अधिक अनधिकृत झोपडया हटविण्याचे काम केले होते. या झोपडया हटवितांना महिलांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटविणाºया पथकावर दगडफेक करून दहशत निर्माण केली होती. या प्रकारानंतर मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली खरी परंतू काही अधिकाऱ्यांनी ऐनवेळी नमती बाजू घेत तक्रार न देता माघारी फिरण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. या प्रकारामुळे अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टीवासियांची हिंमत वाढली आहे. शासनाने सिंहस्थ कुंभमेळयासाठी तपोवनात साधुग्रामसाठी जागा आरक्षित केली असून झोपडपट्टीधारक याच जागेवर वारंवार अनधिकृत झोपडया थाटून महानगरपालिकेसमोर आव्हान उभे करीत असताना हटविण्यात आलेल्या झोपडया पुन्हा उभ्या केल्या जात असताना या अनधिकृत झोपडयांकडे महानगरपालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद रोडवर थाटलेल्या या झोपडपट्टयांमुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त तर झाले असून या भागातील अस्वच्छतेमुळे विविध प्रकारचे आजार पासरण्याची दाट भिती परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.