आझादनगर : शहरातील जुना आग्रा रस्त्यावरील अग्निशामक केंद्र ते पांजरापोळपर्यंतचे सुमारे ८० ते ८५ व्यावसायिकांचे रस्त्यावर थाटलेली दुकाने मनपाच्या अतिक्रमण पथकाकडून आज सकाळी उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक वर्षांनंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला. याच ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवीन बसस्थानक समोरील व्यावसायिकांनी पूर्ण फुटपाथ गिळंकृत केल्याने नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. याकडे साफ दुर्लक्ष करीत येथे व्यापारी संकुल असून, त्यास अडथळा निर्माण करणाऱ्यांची अतिक्रमणे काढण्यामागे मनपाच्या संबंधित विभागाचे काही हितसंबंध आहेत का? याची चर्चा परिसरात होत आहे. आज सकाळी सुमारे ११ वाजता मनपाचे अतिक्रमण अधीक्षक, प्रभाग क्रमांक तीनचे प्रभाग अधिकारी यांनी एक जेसीबी, दोन मोठी वाहने व सुमारे पंचवीस मजुरांच्या पथकासह मुख्य अग्निशामक केंद्र ते पांजरापोळ शॉपिंगपर्यंतच्या रस्त्यावरील दुचाकी खरेदी-विक्री करणारे व गॅरेज असे एकूण ८०-८५ अतिक्रमणधारकांची दुकाने हटविली आहेत. (वार्ताहर)
जुना आग्रा रोडवरील अतिक्रमण हटविले
By admin | Published: January 26, 2017 1:06 AM