नाशिक : द्वारका ते फाळके स्मारक या राष्टÑीय महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील हॉटेल व गॅरेजची वाहने तसेच मोठी वाहने उभी राहात असल्याने या रस्त्याचा वाहतुकीसाठी कमी व व्यावसायिकांसाठीच अधिक वापर होत असून, महापालिका, पोलीस यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्यात आला असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते करण्यात आले आहेत. जेणे करून शहरांतर्गत जाणाऱ्या वाहनांनी महामार्गाऐवजी समांतर रस्त्याचा वापर करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवावी. परंतु या समांतर रस्त्याचा ताबा व्यावसायिकांनी घेतला आहे. या मार्गावर सर्वाधिक संख्या हॉटेल व्यावसायिकांची असून, त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक सर्रासपणे समांतर रस्त्यावरच आपली वाहने तासनतास उभी करतात त्यामुळे वाहतुकीस नेहमीच खोळंबा होत असतो. या रस्त्यावर काही ठिकाणी मोटार गॅरेज दुरुस्तीचे दुकाने असल्यामुळे त्यांनीही आपला व्यवसाय रस्त्यावर मांडला असून, दुरुस्तीसाठी येणारी वाहने समांतर रस्त्यावर उभी करून त्यांची कामे केली जातात. या रस्त्यावरून भाभानगर, दीपालीनगर, सूचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, वासननगर, पाथर्डी फाटा यांसह विविध उपनगरांमध्ये जाण्याचे मार्ग आहेत. परंतु समांतर रस्त्यावरील अतिक्रमणामुळे येथील नागरिकांना महामार्गाचाच वापर करावा लागत आहे. परिणामी रस्ता वाहतूक अधिक धोकादायक झाली असून, महापालिका व पोलीस यंत्रणेने समांतर रस्त्यावरचे अतिक्रमण दूर करून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.