नाशिक : महापालिकेने सोमवारपासून पुन्हा एकदा अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केल्यानंतर व्यावसायिक व नागरिकांनी चांगलाच धसका घेतला असून, स्वत:हून अतिक्रमित बांधकाम काढून घेतले जात आहे. दरम्यान, नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांना आणखी मुदत मिळावी म्हणून महापालिकेने दोन दिवसांसाठी मोहीम थांबविली असून, रेड मार्किंगचे काम मात्र युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.मनपाने गंगापूररोड व पेठरोड याठिकाणी मोहीम राबविल्यानंतर आयुक्तांनी आठ दिवसांसाठी मोहीम थांबवत नागरिक व व्यावसायिकांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळत शहरात ठिकठिकाणी रहिवाशांसह व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमित बांधकाम हटविले होते. दरम्यान, आयुक्तांनी दिलेला कालावधी संपल्यानंतर पुन्हा एकदा गेल्या सोमवारपासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पाथर्डी फाटा ते साईनाथनगर चौफुली दरम्यानच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा पडला. एकीकडे पालिकेची मोहीम सुरू असतानाच, अनेक व्यावसायिकांनी स्वत:हून बांधकामे हटविली. नागरिक व व्यावसायिकांकडून स्वत:हून प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना आणखी मुदत मिळावी म्हणून दोन दिवस मोहीम थांबविण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला आहे. मंगळवारी महापालिकेची महासभा असल्याने मोहिमेला विश्रांती देण्यात आली होती. (प्रतिनिधी)
अतिक्रमण हटावला दोन दिवस विश्रांती
By admin | Published: January 22, 2015 12:53 AM