सातपूर : महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून संत कबीरनगर झोपडपट्टीलगत पाइपलाइन रोडवरील सुमारे ४० अनधिकृत पत्र्याचे शेड आणि वाढीव बांधकामे हटण्याची कारवाई केली आहे. यावेळी झोपडपट्टीधारकांनी तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांच्या फौजफाट्यापुढे त्यांचे काही चालले नाही.संत कबीरनगर झोपडपट्टीवासीयांनी पाइपलाइन रोडवर आणि महानगरपालिकेच्या ड्रेनेजवर अनधिकृत झोपडपट्ट्या, पत्र्याचे शेड आणि काही बांधकामे करून अतिक्रमण केलेले होते. दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढत गेले. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्याचा आधार घेत बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांचा ताफा संत कबीरनगरात पोहोचला. त्यावेळी अतिक्रमणधारकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी घरपट्टी भरत असल्याची पावती दाखवून अतिक्रमण अधिकृत असल्याचा दावा केला. विभागीय अधिकाºयांनी हा दावा फेटाळून लावला. पोलिसांच्या फौजफाट्यापुढे त्यांचे काहीही चालले नाही. पाइपलाइनलगत आणि ड्रेनेज लाईनवरील अनधिकृत व अतिक्रमित केलेले सुमारे ४० पत्र्याचे शेड, झोपड्या, वाढीव बांधकामे हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. अतिक्रमण हटविण्याची मोहीम दुपारी साडेचार वाजेपर्यंत चालली. या धडक मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस कर्मचारी, २० महिला पोलीस तर मनपाच्या अन्य विभागाचे अधिकारी, अतिक्रमण, बांधकाम, विद्युत, विभागाचे सुमारे ६० कर्मचारी, २ जेसीबी, ४ डंपर, ६ ट्रक, पोलीस व्हॅन आदींचा समावेश होता.वॉक विथसाठी अतिक्रमणची मोहीममहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारपासून शहरात पुन्हा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबविण्याचे ठरविले असून, त्याची सुरुवात येत्या शनिवारी संत कबीरनगरच्या जवळच असलेल्या पाइपलाइन रोडवरील जॉगिंग ट्रॅक येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंढे यांच्या उपक्रमापूर्वीच हे अतिक्रमण हटविण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
संत कबीरनगरातील अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:15 AM