देवळा : वाजगाव ते वडाळा रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वाजगाव ते वडाळा या तीन किलोमीटर डांबरी रस्त्यापैकी वाजगाव ते देवरे वस्तीपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खडी उखडली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. तसेच ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांच्या फांद्या वाढून रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या ह्या वृक्ष व झुडपांमुळे रस्त्यावरील वळणे धोकादायक व अपघात प्रवण क्षेत्र झाली आहेत. यामुळे वडाळे गावाकडून ट्रॅक्टरने शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच इतर वाहनचालकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खड्ड्यात वाहन आदळून वाहनांचे नुकसान होते. ह्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करीत मार्ग काढावा लागतो. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाने या रस्त्यावरील झाडेझुडपांचे अतिक्रमण काढून टाकावे व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाजगाव व वडाळे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
वाजगाव-वडाळे रस्त्यावर झुडपांचे अ्रतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 4:34 PM