नाशिकरोड : अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने शनिवारी नाशिकरोडला दोन प्रकरणांमध्ये बारा अनधिकृत बांधकामे हटविली.नाशिकरोड गुरुद्वारामागील श्री आकृती सोसायटी येथील राजेश पर्सिया (ओम प्लायवूड) यांचे इमारतीच्या सामासिक अंतरातील दुकाने पत्रे, शेड व पार्किंग जागेतील प्लायवूड साठा व तारेचे कुंपण हटविण्यात आले. श्रीकृष्ण कन्सल्टंट सर्व्हिसेसचे शेड व लोखंडी गेटचे बांधकाम हटविण्यात आले. दत्तमंदिररोडवरील आनंदभक्ती संकुल येथील श्याम दळवी (अर्णव फॅमिली रेस्टॉरंट) यांचे फोल्डिंग रूफ व कम्पाउंंडचे अनधिकृत बांधकाम, आशा खाडे (बावरी कलेक्शन) यांचे शेडचे बांधकाम, शारदा कटारनवरे (माँजिनीस केक शॉप) यांचे शेड, साइड मार्जिनमधील जाळी व शटरचे बांधकाम, संतोष टाके व लक्ष्मीकांत टाके (मॅक्स फोटो स्टुडीओ) यांचे शेडचे बांधकाम हटविण्यात आले.आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात आली. सहाही विभागांमध्ये ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक आदी ठिकाणी अतिक्रमित भाजी-फळ विक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व व्यावसायिक यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमित बांधकामे काढून घ्यावीत, असे महापालिकेने कळविले आहे.
नाशिकरोड परिसरातील अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:30 PM