नाशिक : पेशवेकालीन स्थापत्यक लेचा उत्कृष्ट नमुना असलेले नाशिकमधील सुंदरनारायण मंदिराची उभारणी सन १७५६च्या सुमारास गोदाकाठावर करण्यात आल्याचे बोलले जाते. राज्य पुरातत्व विभागाने या मंदिराला ‘संरक्षित वास्तू’चा दर्जा दिला. मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपूर्वी पुरातत्व खात्याकडून हाती घेतले गेले आहे. पहिल्या टप्प्यात गर्भगृहाच्या बाह्य बाजूच्या नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात साडेचार ते पावणेपाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
गोदाकाठावर अनेक लहान-मोठी पुरातन मंदिरे आजही बघावयास मिळतात. त्यापैकी एक सुंदरनारायण. पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. मंदिराची पडझड रोखण्यसाठी सुंदरनारायण मंदिराच्या संरक्षित वास्तूचे नूतनीकरणाचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे. यासाठी शासनाने सुमारे १२.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या गर्भगृहाचे जुने दगड उतरविण्यात आले आहे. गर्भगृह, शिखर दुरुस्तीसह नूतनीकरणाचे काम २०१९अखेर पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर मंदिरावर कळस स्थापना करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंदिराचे उर्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी दिली.पेशवेकालीन अद्भुत मंदिरराज्य पुरातत्व विभागाकडून नाशिक विभागात एक मंदिर आणि सात किल्ल्यांची डागडुजीची कामे सध्या सुरू आहते. पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणा-या मंदिरांपैकी एक सुंदर नारायण मंदिर आहे. यादवकाळातील मंदीरांच्या तुलनेत या मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड कमकुवत असल्याने पडझड अधिक झाली. नाशिकच्या आजुबाजुच्या परिसरातील स्थानिक दगडांचा वापर यासाठी त्यावेळी केला गेला आहे. पेशवेकालीन मंदीर बांधकाम शैलीचा अद्भूत कलाविष्कार आहे. हे मंदीर मंदीराची संपुर्ण रचना पूर्ण करणारे आहे. शिखर, गर्भगृह तसेच मंडप, मुख मंडप, तीन प्रवेशद्वार या मंदिराला आहे. पेशवेकालीन मंदीर बांधकाम शैलीचा हा सुंदर नमुना असल्यामुळे पुरातत्व खात्याने त्यास संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे.मार्च महिन्यात २० आणि २१ तारखेला सुर्याचे पहिले किरण गर्भगृहातसंपुर्ण काळ्या पाषाणात कोरीव कलाकुसर असलेल्या या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे सुर्याचे उत्तरायण कालावधीत मार्च महिन्यात २० आणि २१ तारखेला सुर्याचे पहिले किरण या मंदिराच्या गर्भगृहातील मुर्तीच्या पायाजवळ पडते. हा उल्लेख बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅझेटियर १८८३मध्येही आढळतो. मंदिराच्या पुर्व दरवाजावर या मंदिराचे बांधकामाची त्याकाळातली रक्कम अवघे १० लाख इतकी होती अशी माहिती मिळते. दहा लाखांत उभी राहिलेली मंदिराची ही वास्तू अत्यंत देखणी व मंदिरवास्तूशास्त्र तसेच पेशवेकालीन स्थापत्यकलेचा आदर्श नमुना आहे.१२.५० कोटींचा प्रस्तावित निधीसुंदर नारायण मंदिराच्या दुरुस्तीसाठी राज्य पुरातत्व विभागामार्फत राज्याच्या सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्रालयाकडे १२.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात साडेचार ते पावणेपाच कोटी रुपयांच्या निधीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात गर्भगृह, शिखर दुरुस्तीसह नूतनीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे.संपुर्णत: निकामी झालेले दगड बदलणारमंदिराच्या वास्तूचे जे दगड १०० टक्क्यांपेक्षा अधिक निकामी झाले आहेत ते संपूर्णत: बदलण्यात येणार आहेत, तर जे दगड काही प्रमाणात सुस्थितीत आहेत, त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्याअगोदर संपूर्ण वास्तूचे चित्रीकरण करण्यात आले होते. यानुसार वास्तुविशारदांसह तज्ज्ञांनी संपूर्ण मंदिराच्या बांधकामाचे निरीक्षण केले. शिखराची पडझड अधिक झाली असून, दगड निकामी झाल्याचे निरीक्षणात आढळून आले.संरक्षित स्मारकाचा दर्जारेखीव कलाकुसर, अप्रतीम नक्षीकाम, दगडी बांधकाम असलेल्या आकर्षक स्थापत्यकलेचा नमुना म्हणून पेशवेकालीन सुंदर नारायण मंदिर ओळखले जाते. २६२ वर्षे जुने हे मंदिर राज्याच्या पुरातत्व विभागाने त्याची बांधकाम शैली, त्यावरील नक्षीकाम बघून राज्याचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. हा ऐतिहासिक वारसा जपला जावा या उद्देशाने शासनाने निधी उपलब्ध करुन देत दुरूस्तीचे काम पुरातत्व खात्यामार्फत सुरू केले आहे.