पेठ : तालुक्यातील निरगुडे (क) येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा गावानजीक असलेल्या तलावात बुडून अंत झाल्याची घटना घडली. तुषार नामदेव जाधव (१०) हा निरगुडे आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. रविवारी दुपारी अंघोळीसाठी गावानजीक तलावावर गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून अंत झाला. ही बाब त्याचे गावातील नातेवाईक व नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने तुषार यास बाहेर काढले. त्यास उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या खबरीवरून पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंदर्भात पेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
तलावात बुडून शाळकरी मुलाचा अंत
By admin | Published: March 27, 2017 1:11 AM