नाशिक : महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के काम झाले आहे. परंतु, पाणीसाठ्यामुळे धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली होती. गेल्या २८ फेबु्रवारीला मुकणे धरणातून आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा ३८ टक्क्यांवर आला असून त्यामुळे हेडवर्क्सच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेणा-या एल अॅण्ड टी कंपनीला जुलै २०१८ अखेर काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे परंतु, पाणीसाठ्यामुळे कामात खोळंबा झाल्याने कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून डिसेंबर २०१८ अखेर मुकणेचे पाणी नाशिकला आणण्याचे नियोजन केले जात आहे.मुकणे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे नाशिकला पाणीपुरवठा करण्याची योजना असून त्यासाठी सुमारे २६५ कोटी रुपयांचे कंत्राट एल अॅण्ड टी कंपनीला देण्यात आलेले आहे. परंतु, मुकणे धरणातील हेडवर्क्सची कामे पूर्ण करण्यातच कंपनीला अडचणी निर्माण होत आहे. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुकणे धरणात सुमारे ९५ टक्के जलसाठा तयार झाला. मागील १० वर्षांत धरण एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच भरले होते. त्यामुळे धरणातील जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद झालेली होती. हेडवर्क्सचे काम ५८ टक्के इतकेच झालेले आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय कॉफर डॅमसह अन्य तांत्रिक स्वरूपातील कामे करणे अशक्य होऊन बसले. महापालिकेचे माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली असता, धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी लवकरात लवकर पाण्याची आवर्तने सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. परंतु, कालबद्ध कार्यक्रमानुसारच आवर्तने होतील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, गेल्या २८ फेबु्रवारीला पाण्याचे आवर्तन करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आता ३८ टक्क्यांवर आला असून त्यामुळे हेडवर्क्सची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, कंपनीने गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.
वर्षाअखेर मुकणे धरणाचे पाणी पोहोचणार नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 3:01 PM
हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता
ठळक मुद्देमहापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के कामपाणीसाठ्यामुळे धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली होती