नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या निर्बंधांनंतरही कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन गुरुवारी (दि. २२) रात्री ८ वाजल्यापासून शहरात आणखी कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, पोलिसांनी चौकाचौकात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार, नाशिक शहर व परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू असल्याने शुक्रवारी (दि. २३) सकाळपासूनच शहरातील विविध रस्त्यांवर पोलिसांची पथके तैनात केलेली दिसून येत होती. मात्र, शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असतानाही शहरातील विविध रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कायम होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी व विनाकारण फिरणाऱ्यांना सक्त ताकीद देण्यासोबतच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
दरम्यान, नाशिक शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे पाहून प्रशासकीय यंत्रणेने शासनाच्या नवीन नियमांची अंमलबजावणी कठोरपणे लागू करण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे या कालावधीत नागरिकांची रस्त्यांवर अधिक प्रमाणात वर्दळ होती. त्यानंतर मात्र केवळ रुग्णालये व औषधाची दुकाने वगळता अन्य व्यवसाय पूर्णत: बंद ठेवण्यात आले.
इन्फो-
रस्त्यावरची गर्दी कायम
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, पोलिसांकडून शहरात अतिशय कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत असतानाही शहरातील द्वारका नाशिक रोड, मुंबई नाका ते अशोक स्तंभ, गंगापूर रोड. कॉलेज रोड भागातील रस्त्यांवर वाहनांची व नागरिकांची गर्दी कायम होती. पोलिसांकडून विचारणा करण्यात आलेल्या यातील बहुतांश नागरिकांनी वैद्यकीय कारण देत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी रुग्णांना डबा घेऊन जात असल्याचे अथवा देऊन येत असल्याचे सांगत स्वत:ची सुटका करून घेतली.